लेख
लेख
कचाट्यात टाकणारे प्रश्न
02-18-10
नोकरी म्हटलं की इंटरव्ह्यू देणं आलंच. पण अनेकदा तिथे काय प्रश्न विचारणार याचं टेन्शन येतं. अनेकदा प्रश्न हे तुम्हाला अडचणीत टाकणारे असू शकतात. त्यामुळेच अशा प्रश्नांचा अंदाज धेऊन त्याचं काय उत्तर द्यावं अशी तयारी करता येऊ शकेल.
इण्टरव्ह्यूला जाताना आपल्याला काय विचारलं जाणार, या कल्पनेने खूप साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांची जुळवणी करत असतो. त्यातही आपण अनेकदा जॉब किंवा आपण ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, फक्त त्या संदर्भातल्या प्रश्नांचाच अभ्यास करतो. पण अनेकदा जॉबशी संबंधित असलेले पण आपल्या करिअरशी अजिबात संबंध नसलेल्या प्रश्नांचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळेच आपण गडबडून जाण्याची शक्यता असते.
असे प्रश्न खूप असतात. अनेकदा त्याला काय उत्तर द्यावं हे सुचल्याने अशाच काही प्रश्नोत्तरं देत आहोत. अर्थात शेवटी तुम्ही किती आत्मविश्वासाने योग्य उत्तर देता यावरच सर्व काही अवलंबून असतं.
आम्ही तुमची निवड का करावी?
अशा प्रश्नावर तुम्ही आपल्याकडे असलेल्या कौशल्य, अनुभवाचा कंपनीला किती उपयोग होऊ शकेल, हे सांगा. इतर उमेदवाराशी स्वत:ची तुलना करणं तुम्हाला महागात पडू शकेल.
तुमच्या सहकाऱ्यांमध्ये असलेल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अजिबात आवडत नाहीत?
हा प्रश्न तुम्हाला कचाट्यात टाकण्यासाठी असू शकतो. मी खूप विचार केला पण अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्यामुळे मला सहकाऱ्यांचा राग येतो, असं उत्तर देऊन मोकळे व्हायला हरकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरावर लांबड लावू नका.
तुमचा ड्रीम जॉब काय?
कोणत्याही एका जॉबचा उल्लेख करणं चुकीचं ठरेल. जर तुम्ही ज्या पदासाठी इण्टरव्ह्यूला गेला आहात, त्यापेक्षा वेगळा जॉब सांगितलात तर तुम्ही इथे न्याय देऊ शकणार नाहीत किंवा तुम्ही योग्य उमेदवार नाही, असा समज होऊ शकेल. त्यामुळे ज्या जॉबसाठी तुम्ही जात आहात, तेच काम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं असं सांगा.
कोणत्या प्रकारच्या माणसांबरोबर काम करणं तुम्हाला आवडणार नाही?
गोंधळात पडू नका. कोणत्याही माणसांबरोबर आपण काम करू शकतो, हे ठामपणे म्हणणं तुम्हाला भाग आहे. कारण तुम्ही अमूक प्रकारच्या, स्वभावाच्या माणसाबरोबर काम करू शकत नाही, असं सांगितलंत तर कंपनीत तुम्हाला घ्यावं की नाही याचा विचार केला जाईल.
तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, पैसा की काम?
पैसा तर महत्त्वाचं आहेच पण त्याहून खूप महत्त्वाचं आहे ते काम. हे उत्तर कायम ध्यानात ठेवा. मग ती कंपनी कोणतीही असो, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जॉबसाठी इण्टरव्ह्यू द्यायला गेला असलात तरी.
खूप प्रेशर्सखाली असताना तुम्ही कशा प्रकारे काम कराल?
तुम्ही ज्या पदासाठी इण्टरव्ह्यूला गेला असाल, त्या क्षेत्रातील आव्हान, ताण यांचा अंदाज तुम्हाला असतोच. त्यानुसार एखाद्या उदाहरणासह वर्कप्रेशर कसं हॅण्डल कराल, ते सांगा.
तुम्ही ओव्हरटाइम, नाइट शिप्ट किंवा विकेण्डला काम करणार का?
अर्थात हे उत्तर तुमच्यावर अवलंबून आहे. पण जे काही उत्तर द्याल ते प्रामाणिकपणे द्या. उगाच खोटं बोलून पुढे काम करताना त्रास होण्याची शक्यता असते.
तुम्ही ज्या पदासाठी इथे इण्टरव्ह्यूसाठी आला आहात, त्या पदासाठी तुम्हाला कोणाची नेमणूक करायची असल्यास तुम्ही त्याची निवड कशी कराल?
कशा प्रकारचा उमेेदवार निवडायचा आहे, हे सांगताना आपण त्या पदासाठी इण्टरव्ह्यू द्यायला आलो आहोत, याचा विसर पडू देऊ नका. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काळजीपूर्वक द्या.
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 |
Copyright © 2010 gappatappa.com.
